इतिहास
पिंपरी - चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे भोसरी. भोसरीचे खरे नाव भोजापुरी. भोजापुरी ही राजा भोज यांची राजधानी. भोजापुरी या नावाचा अपभ्रंश भोसावरी व त्यानंतर भोसरी असा झाला आहे. म्हणून या गावाला भोसरी म्हणून ओळखले जाते. भोसरीच्या मोकळ्या रानात एक मातीचे मडके व काही बांधकामाच्या विटा आढळून आल्या असून हे मडके सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्वी 200 ते 280 च्या काळातील असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. तसेच राजा भोजाच्या राजधानीपासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांच्या दरबारी नाचणा-या कळवतनीची वसाहत होती. त्याला कळवतनीचा महाल असे म्हणत असत. या महालाच्या भिंतीच्या खंगरी विटा, नुकत्याच आढळून आल्या असून त्या वस्तू सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या असल्याचे तज्ञ्यांनी सिद्ध केले आहे. यावरून हे शहर पुरातन असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत या कळवतनीच्या महालासमोर एक मंदिर असून त्याला कळवतनीचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
यादवकाळ किंवा सिल्हारस काळाच्या पूर्वी म्हणजे इ.स.850 ते 1310 मध्ये युद्धात मरण पावलेल्या शहरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दगड कोरण्याची पद्धत होती. या गावात आढळून आलेल्या या दगडावरील कोरीव कामावरून हे काम याच काळात झाल्याचे सिद्ध होते. तसेच हे लढवय्याचे गाव असल्याचेही दिसून येत असून, अतृप्त आत्म्यांपासून संरक्षण करण्यासाठी गावात खंडोबा, म्हसोबावीर, चंडोबा व सरवाई आदी देवांची देवस्थाने निर्माण झाली असावीत ही सर्व मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या भागात सर्वत्र धडग्यांसारखे दगड आढळून येत असल्याची नोंद बॉम्बे गॅझिटीयर्स डेक्कन मध्ये करण्यात आली असून, हे दगड बुद्धकालीन स्तुपांचे असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. यावरून भोसरी हे गाव भगवान बुद्धाच्या काळातील असल्याने दिसून येते.
मोरया गोसावींनी मोरगावला मोरेश्र्वराची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यामुळे समाजाला त्यांची प्रचीती येत होती. मारयांना त्यामुळे उपसर्ग होत होता. त्यांच्या सेवेत खंड पडत होता. त्यांनी मोरगाव सोडले.
ताथवडे गावाजवळच्या जंगलात पवना नदीच्या काठी बसून गणेश उपासनेस प्रारंभ केला. दर मासी शुद्ध चतुर्थीस मोरगावी व वद्य चतुर्थीस थेऊर अशी वारी त्यांनी सुरु केली.
चिंचवड येथील काही भाविकांनी हे माहीत झाल्यानंतर त्यांनी मोरयांना चिंचवडला पवनेकाठी येण्याबाबत विनवले व कोणताही उपसर्ग होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोरया गोसावी चिंचवडला पवनेकाठी वास्तव्याला आले. येथे वास्तव्याला असलेल्या चिंतामणीने त्यांना लग्न करण्याची आज्ञा केली असल्याचे म्हणतात. त्यानंतर मोरया गोसावी यांनी ताथवडे येथील गोविंदराव कुलकर्णी यांच्या मुलीशी सन 1470 मध्ये विवाह केला. त्यांच्या पत्नीचे नाव उमा. मोरयांचा थेऊर, रांजणगाव व चिंचवड असा प्रवास चालूच होता. याकाळात त्यांना मुलगा होईल व तो माझा अंशरुप असेल असा दृष्टांत चिंतामणीने दिला. छातीवर हातांचे पंजे असणारा मुलगा जन्माला येईल असे सांगितले. त्यानंतर सन 1481 मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले चिंतामणी. तेच पुढे थोरले चिंतामणी महाराज म्हणून नावारुपास आले.
मोरयांनी श्रींची सेवा सुमारे 69 वर्षे केली. पत्नी उमाबाईंचे निधन सन 1556 मध्ये तर गुरु श्री नयनभारती हे सन 1558 मध्ये समाधिस्थ झाले. मोरया गोसावींनीही आपले कार्य संपले असा निश्चय करुन, सन 1561 मध्ये पवना नदीच्या काठी वयाच्या 187 व्या वर्षी जिवंत समाधी घेतली.दिल्लीवर राज्य करणारा हुमायून बादशहा दिल्लीच्या गादीवरून पदच्यूत झाला असताना गुजरातेत पळून आला. तो मोरया गोसावींच्या बाबत ऐकून होता. त्याने मोरयांकडे वाचविण्याबाबत विनवणी केली. श्री मोरया गोसावी यांनी त्याला काबूलला सुरक्षित जाण्यास मदत केली . पुन्हा तो दिल्लीचा बादशहा झाला. त्याने श्री.मोरया गोसाव्यांच्या नावे सनद करुन दिली असल्याची नोंद असल्याचे पारसनीस व मार्टीन लिखित सनदस् ऍन्ड लेटर्स ऑफ हुमायून या पुस्तकात म्हटले आहे.
चिंचवडच्या मोरया गोसाव्यांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय आदर होता. परंतु शिवाजी महाराज हे परखड होते. सिंहगडच्या किल्ल्यावर किल्लेदाराला सांगून चिंचवडच्या देवांनी दोन इसमांना परस्पर बंदिखान्यात ठेवले असल्याचे महाराजांना माहीत पडले. तेव्हा शिवाजी महाराज देव महाराजांना म्हणाले, च्तुम्ही आमच्या कारभारात ढवळाढवळ करता, तेव्हा तुमची बिरुदे आम्हाला द्यावीछ, आमची बिरुदे तुम्ही घ्यावी. किल्लेदाराला त्यांनी विचारले, तू चाकर कोणाचा ?
देवांचा की आमचा ? असा उल्लेख द.ग.गोडसे लिखित च्समन्दे तलाशछ या पुस्तकात करण्यात आला आहे. यावरुन छत्रपती शिवरायांची चिंचवडच्या मोरया गोसावी व देव महाराजांवर नितांत श्रद्धा असल्याचे सिद्ध होते. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या बांधकामाला 1650 मध्ये प्रारंभ झाला व 1720 मध्ये हे काम पूर्ण झाले. श्री.मंगलमूर्तींचे येथील देवघर 1605 मध्ये बांधण्यात आले असून अद्यापही ते व्यवस्थित आहे. त्यावेळी येथील उत्पन्न वीस हजार रुपये होते. पुढे उत्पन्न वाढत गेले.
सोलापुरला कलेक्टर कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीला असलेल्या हरि विनायक चापेकर यांनी नोकरी सोडली. त्यांना भजन कीर्तनाची आवड असल्यामुळे हा व्यवसाय पत्करला. थोरला मुलगा दामोदर हा कीर्तनात बाजाची पेटी वाजविण्याचे काम करीत असे. या निमित्ताने नागपुर पलीकडे रायपुर म्हणून शहर आहे तिकडे आगगाडीने प्रवास करताना वृक्षांकीत डोंगराळ प्रदेश पाहण्यात आला. एखादे भयंकर कृत्य करून ही जागा आश्रय घेण्यास किती सोयीस्कर आहे, असा विचार हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांनी येरवडा जेलमध्ये 1897 मध्ये असताना मोडी लिपीत लिहीलेल्या आत्मवृत्तांत म्हंटले आहे. चिंचवड गावात जन्म झालेल्या दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर यांच्या मनात सुरूवातीपासूनच इंग्रजांबद्दल चिड होती. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर ते पुण्यात रहायला गेले. दामोदर हरी चापेकर यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. तिघेही बंधू तालिमबाज होते व त्यांना सैन्यात जाण्याची इच्छा होती. परंतु ते त्यामध्ये जाऊ शकले नाहीत.
भारताला परकीय दास्यातून मुक्त करावयाचे असेल तर प्रत्येक भारतीयाने हिंसा, क्रांती व चाणक्य नीती आत्मसात करून घेतली पाहिजे अशी दामोदर हरी चापेकरांची विचारधारणा होती. या शिकवणीचा त्यांच्या भावांनी अवलंब केला व ब्रिटिश अधिकारी रॅन्डला ठार मारण्याच्या प्रयत्नात सहभागी झाला.
रँडच्या खुनानंतर तीन महिने चापेकर बंधुंनी मुंबईत घालविले. एके दिवशी गोपाळराव साठे प्रकरणी पालीसांचे साधे बोलावणे आले. त्यावेळी पुण्यात ब्रुईज साहेबाजवळ नेले त्याठिकाणी मी लोकहिताचा विचार करून काही विशेष अटीवर पो.सु. ब्रुईज यांच्याजवळ खुनाची कबुली स्वतहून दिली व मोठा अभिमानाने ही घटना केल्याचे सांगून पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविल्याचे हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांनी त्यांच्या आत्मवृत्तात म्हंटले आहे. प्रथमत मी एकटानेच हे कृत्य केल्याचे सांगितले. मात्र इंग्रज अधिकाज्यांना ते न पटल्याने यामध्ये माझा भाऊ बाळकृष्ण हरी चापेकर ही सहभागी होते. ते ही या यशाचा वाटेकरी असल्याची कबुली पोलीसात त्यांनी स्वतहून दिली. त्यानंतर त्यांना अटक झाली व फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर दुसरे बंधु बाळकृष्ण हरी चापेकर यांना फाशी देण्यात आली. रँडच्या खुनाचे नाव सांगणाज्या हरी बंधुंनी सरकारला चापेकर बंधुंची नावे सांगितली हे वासुदेव हरी चापेकर यास समजताच त्याने या फितुरांचे मुडदे पाडले. त्यालाही अटक झाली व फाशीची शिक्षा झाली. देशाच्या हितासाठी व अन्यायाविरूद्ध लढणाज्या एकाच कुटुंबातील तीनही भावंडे हुतात्मा झाली.